Saturday, April 17, 2010

Thursday, April 15, 2010

Friday, April 9, 2010

याचा अर्थ असा नाही

मी ई-मेल फॉरवर्ड करतो



याचा अर्थ असा नाही,


की मला काही काम नाही.


कामात फोन करून,


व्यत्यय आणण्यापेक्षा


ई-मेलसारखे दुसरे साधन नाही.






मी हसत असतो


याचा अर्थ असा नाही,


माझं डोकं जाग्यावर नाही


दु:खाचं प्रदर्शन करून


सांत्वनाचे शब्द मिळवण्यापेक्षा,


हसत राहणे वाईट नाही.






मी सुखी दिसतो


याचा अर्थ असा नाही,


की मी दु:खात होरपळलो नाही


दुसऱ्याला दु:खात खेचण्यापेक्षा


एकट्याने होरपळणे चुकीचे नाही.






सर्वांची खिल्ली उडवतो


याचा अर्थ असा नाही,


की मला त्यांच्या भावनांची कदर नाही


खोटेपणा करून


मर्जीत राहण्यापेक्षा


खिल्ली उडवणे वाईट नाही.






कट्ट्यावर टपोरीगिरी करतो


याचा अर्थ असा नाही,


की मला प्रेम समजत नाही


प्रेम करून कुणाला फसवण्यापेक्षा


टपोरीगिरी वाईट नाही.






पी. जे. मारून हसवतो


याचा अर्थ असा नाही,


की मला परिस्थितीचं गांभीर्य नाही


तणाव निर्माण करण्यापेक्षा


पी. जे. मारून


तणाव घालवणं वाईट नाही.

Thursday, April 8, 2010

पी. जे.


नकार देणे ही कला असेल.. पण, होकार देऊन काहीच न करणे , ही त्याहून मोठी कला आहे.


************ ********* ********* ********* ********* ********* ********* *********

जसा मच्छर मारून तू शिकारी बनणार नाहीस

तसाच 10-12 मेल फॉरवर्ड केल्याने तू भिकारी बनणार नाहीस

************ ********* ********* ********* ********* ********* ********* *********

तू झाडावर चढू शकतोस का ?

संजीवनी आणू शकतोस का ?

छाती फाडून राम-सीता दाखवू शकतोस का?

नाही ना?



... अरे वेड्या , फक्त माकडासारखं तोंड असल्यानं कुणी हनुमान होत नाही!!!!



************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****

एका झाडावर पाच पक्षी बसलेले असतात.

तिथे एक शिकारी येतो आणि गोळी झाडतो.

एका पक्ष्याला गोळी लागते. तो खाली कोसळतो.

गोळीबाराने घाबरून तीन पक्षी उडून जातात.

एक पक्षी मात्र झाडावर तसाच बसून राहतो...

... का?



..अंगात मस्ती , दुसरं काय ?

************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****

जगात एकच सर्वात सुंदर मूल आहे आणि प्रत्येक आईपाशी ते असते ,

असा एक सुंदर सुविचार तुम्ही वाचला असेलच. त्याचा उत्तरार्ध माहिती आहे का ?



जगात एकच सर्वात सुंदर बायको असते आणि ती प्रत्येक शेजाऱ्यापाशी असते!!!!

************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****

हुशार बायको नेहमी नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते की त्याला दुसऱ्या बाईचे लाड पुरवणं अशक्य व्हावं!!!

************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****

प्रश्न् : चीनची लोकसंख्या ओलांडून भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला, तर त्याचे वर्णन फक्त दोन शब्दांत कसे कराल ?

उत्तर : चीनी कम!!!!

************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****

तुफान पाऊस पडतोय...

तुला वाटत असेल

छान बाहेर पडावं

भिजून चिंब होत

पाणी उडवत

गाणं गाताना

कुणीतरी खास भेटावं...

हो ना?

अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?

प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!!!

************ ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* ********* *****


Wednesday, March 31, 2010

उडणारी म्हातारी

एकदा केव्हातरी शांतपणे बसून विचार केला की आपण वयानुसार काय काय गोष्टी सोडल्या आणि बदल्यात काय मिळवलं ह्याचा आढावा घेता येतो. मग लक्षात येतं की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. कोकणात मामाच्या बागेतले रायआवळे दगड मारून पाडलेले नाहीत. सकाळी सकाळी मामाने दिलेला म्हशीच्या धारोष्ण दुधाचा पेला कितीतरी वर्षात ओठाला लागलेला नाही. आज्जीच्या हातचं चुलीवर केलेलं पिठलं खूप वर्षात मिळालेलं नाही. जत्रेत मिळणारी पिपाणी खूप वर्षात वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही, कारण परिस्थितीने दिलेले चटके सोसता सोसता पुरेवाट झाली आहे.



चाळीशी बघता बघता उलटली.. जवळचं कमी दिसू लागलं.. चाळीशीचा एक नवा दागिना नाकावर चढला. समवयस्क व एकेकाळी जीवाभावाचे असलेले मित्र मैत्रिणी दूर दूर पांगले गेले. डोक्यावरील केस कमी झाले व चेहेऱ्यावर सुरकुत्या आणि कमरेचा घेर मात्र वाढला. कॉलेज किंवा शाळेतले जुने मित्र मैत्रिणी भेटल्यावर आपापल्या मुलांच्या ओळखी करून देऊ लागले. " हा मोठा यंदा दहावीला गेला आणि ही धाकटी सातवीला. " जेव्हा ही मुलं काका म्हणतात तेव्हा काळजात धस्स होतं.


वाटतं बाल्य संपलं आणि तारुण्यही ईतिहासजमा झालं. वयाचा किमान दोन त्रितियांश हिस्सा संपला. आई अजूनही म्हणते " अरे चाळीशी उलटली, आता तरी मोठ्या माणसासारखा वाग." बायकोबरोबर चालताना चुकून अभावितपणे मान वळली तर बायको म्हणते " अहो काय हे? शोभत नाही हो ह्या वयात."


सर्कशीतला जोकर आता आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच वाऱ्यावर उडणारी कापसाची म्हातारी पकडण्यात आता चार्म राहिलेला नाही. कापसाच्या त्या म्हातारीने उडता उडता आपला "बालपणीचा सुखाचा काळ" स्वत:बरोबर कधी नेला ते कळलंच नाही.


आजी गेली, मामा गेला. आता पूर्वीसारखी कोकणात जायची ओढच राहिलेली नाही. आता त्या शाळेतल्या ट्रिप्स नाहीत, पहिल्या पावसात भिजायचा आनंद नाही. कॉलेजच्या बाहेर उभे राहून मारलेला कटिंग चहा आणि सिगारेट नाही. गल्लीबोळांतलं क्रिकेट नाही. कॉलेजचं लेक्चर बुडवून पाहिलेले पिक्चर्स नाहीत.......


त्या उडत्या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली वाढतं वय तिने आपल्या पदरात टाकलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण मात्र जमिनीवरच आहोत...